पंधरा दिवसांपासून मनःस्थिती ठीक नव्हती… काल रात्री झोपेतून उठून बाहेर पडली… पहाटे थेट मृतदेहच दिसला..!; खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बोरी अडगाव (ता. खामगाव) येथे आज, ६ जुलैला पहाटे दोनच्या सुमारास समोर आली. ती रात्री दहानंतर झोपेतून उठून घराबाहेर पडली होती. त्यानंतर तिचा घरच्यांनी शोध घेतला असता थेट मृतदेहच आढळला.
सौ. संध्या सागर वावगे (२७, रा. बोरी अडगाव) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिच्या पतीने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, त्याचे लग्न २१ मे २०२० रोजी आंबेटाकळी येथील उत्तम इंगळे यांची मुलगी संध्याशी झाले होते. त्यांना दोन महिन्यांची मुलगी अनन्या आहे. गेल्या १५ दिवसांपासून संध्याची मनःस्थिती चांगली नव्हती. ती तिच्या मुलीला जवळदेखील घेत नव्हती. ती काहीही ऐकत नव्हती. तिचा भाऊ प्रवीण इंगळे यांना तिच्या वागण्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आई, वडील, भाऊ तिच्या भेटीसाठी आले होते व तिला भेटून गेले होते. काल ५ जुलैला रात्री १० ला जेवण करून सर्व झोपी गेले.
पहाटे दोनला तिचा पती सागरला जाग आली तेव्हा संध्या घरात नव्हती. त्याने आई, वडील व जावई यांना उठवून माहिती दिली. सर्वत्र तिचा शोध सुरू केला. त्यानंतर जावई अनंता काळे (रा. आसा) यांनी फोनद्वारे त्यांना माहिती दिली की गावाच्या बाजूलाच पुंडलिक दुतोंडे यांच्या विहिरीत संध्या पडलेली आहे. सर्व जण तिला पहायला गेले. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास पोलीस उपनिरिक्षक भगवान राठोड करत आहेत.