घरजावयाने सासऱ्याच्या डोक्यात हाणली काठी!; देऊळगाव राजा तालुक्यातील घटना
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरजावयाने सासरच्या डोक्यात काठी हाणून रक्तबंबाळ केले. बायकोलाही शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना देऊळगाव राजा येथील गिरोली रोडवरील गुगळा देवी मंदिर परिसरात 10 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
भानुदास शिवाजी खंडारे (42) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली, की त्यांना एक मुलगा व दोन मुली असून, पैकी मनिषाचे लग्न वडाळी (ता. सिंदखेड राजा) येथील प्रमोद राऊसाहेब साबळे याच्याशी झाले आहे. जावई आमच्या घरीच एका रूममध्ये मुलाबाळासह राहतात. ते नेहमी दारू पितात. 10 मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ते व त्यांची पत्नी व मुलगा जेवण करून अंगणात बसलेले होते. घरातील टीव्ही पाहत असताना मुलगी मनिषा व तिच्या पतीच्या भांडणाचा आवाज आला. त्यांनी काय झाले असे विचारले तर जावई अंगणात आला. त्यांना म्हणाला की तुमच्या मुलीला पाणी पिण्यासाठी मागितले तर ती अगोदर जेवण करून घ्या , असे म्हणाली. त्यावर मी एवढ्या छोट्या कारणावरून भांडण करत नसतात, असे समजावून सांगत असतानाच जावयाने अंगणातील काठी माझ्या डोक्यात मारली. त्यामुळे डोके फुटून रक्त निघाले. त्यावेळी मनिषा भांडण सोडवत असताना तिलाही त्याने शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर माझी पत्नी सुमन हिने भांडण सोडवले, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.