खामगावात युवासेना शहर प्रमुखाची दादागिरी! तलवार घेऊन आला! म्हणे,मी लीडर.. माझे कुणीच काही वाकडे करू शकत नाही! रात्रभर बांगर कुटुंब दहशतीत..; घर बंद करून वाचवला जीव..

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावच्या राठी प्लॉट भागात २९ एप्रिलच्या रात्री शुल्लक कारणावरून राडा झाला. स्वतःला शिवसेनेचा लीडर म्हणवून घेणाऱ्या राहुल पुंजाजी कळमकार आणि विक्की धारपवार यांच्या विरोधात खामगावच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इलेक्ट्रिकचे काम करणाऱ्या सुपेश अरविंद बांगर (२१, रा. राठी प्लॉट खामगाव) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल कळमकार याने तलवार घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

   तक्रारीनुसार तक्रारदार सुपेश आणि राहुल कळमकार यांच्यात या आधी देखील शुल्लक कारणावरून वाद झालेला आहे. २९ एप्रिलच्या रात्री साडेअकराच्या सुमारास सुपेश एका दुकानावर स्प्राईट आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे राहुल सोबत असणाऱ्या एकाने सुपेशच्या मानेवर चापट मारली होती. त्यानंतर सुपेश घरी गेला.. घडलेली घटना त्याने त्याच्या आईला सांगितली. थोड्या वेळाने राहुल तिथे आला. सुपेशच्या आईने राहुलला विचारले की " तुझ्यासोबतच्या मुलांनी माझ्या मुलाला मारले, त्याचे नाव काय आहे?" त्यावर राहुल म्हणाला की , तुम्हाला नेहमी माझेच नाव दिसते काय? असे म्हणत त्याने वाद घालायला सुरुवात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. "मी लीडर आहे माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही.." असेही राहुल म्हणाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
 याचवेळी सुपेश याने त्याचा मित्र मयूर टाले याला फोन करून बोलावले. मयूर राहुल सोबत बोलत असताना विक्की धारपवार हा लोखंडी रॉड घेऊन सुपेशच्या अंगावर धावून आला,त्यावेळी सुपेशच्या आईने त्याला अडवले. वाद वाढत चालल्याने मयूर टाले याने सुपेशला त्याच्या घरी झोपायला नेले. 
त्यानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास राहुल कळमकर हा पुन्हा तलवार घेऊन आला. सुपेशच्या घराच्या बाहेरील लोखंडी गेटवर त्याने तलवार आपटली. "तुम्ही आता घराच्या बाहेर निघा तुम्हाला जीवाने खाल्लासच करतो.." असे राहुल म्हणत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भीतीपोटी सुपेशचे आई वडील घराच्या बाहेर आले नाहीत. रात्री २ वाजून १० मिनिटांनी राहुल सुपेशच्या घराबाहेरून निघून गेला. माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला राहुल कळमकर याच्याकडून धोका असल्याचे सुपेशने तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.