इच्छादेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुणांचा भीषण अपघात; भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली ;तिघे गंभीर जखमी...
Updated: Jan 19, 2026, 09:50 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : इच्छादेवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या तीन तरुणांची पल्सर दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळल्याने तिघेही तरुण गंभीर जखमी झाले.ही घटना मुक्ताईनगर–मलकापूर महामार्गावर पिंपरी अकाराऊत शिवारात रविवारी दुपारी घडली.
पिंपरी गवळी (ता. खामगाव) येथील अजय विष्णू बंड (वय २२), धीरज (गणेश) वामन इंगळे (वय २२) आणि मंगेश नरहरी बुंदे (वय २१) हे तिघे पल्सर दुचाकी (क्र. एमएच ५४–१४०६) वरून मलकापूरकडून मुक्ताईनगरच्या दिशेने जात होते. पिंपरी अकाराऊत गावाजवळ आल्यानंतर भरधाव वेगामुळे चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली.
अपघाताची तीव्रता इतकी होती की दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातात तिघांनाही डोके व पायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या स्थानिक तरुणांनी व प्रवाशांनी माणुसकी दाखवत तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना रस्त्याच्या कडेला हलवून प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका पाचारण केली. जखमींना प्रथम जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खामगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
