बुलढाण्यात पुन्हा चाकूहल्ल्यात युवकाचा खून; दीड महिन्यात दुसरी रक्तरंजित घटना..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील बसस्टँड मागील जांभरून रोडवर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या चाकूहल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव शुभम रमेश राऊत (वय २७) असे असून आरोपीचे नाव ऋषी जवरे आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शुभम हा बोथरा एमआरआय सेंटरमध्ये कामाला होता. रविवारी रात्री तो मित्र बॉबीसह गावंडे हॉटेलमध्ये जेवत होता. दरम्यान, हातात चाकू घेऊन आरोपी ऋषी जवरे तेथे पोहोचला. तो कुणावर तरी हल्ला करेल या भीतीने शुभम त्याच्याजवळ गेला; मात्र भानावर नसलेल्या ऋषीने थेट शुभमच्या छातीत चाकू खुपसला.
शुभम आणि बॉबीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यात शुभम गंभीर जखमी झाला तर बॉबीच्याही पायाला जखम झाली. धक्काबुक्की दरम्यान ऋषीलाही चाकू लागल्याचे समजते. शुभमला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर जिल्हा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली. शुभमचे आई-वडील, भाऊ व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. 
गेल्या महिन्यात १ ऑगस्ट रोजी चिखली रोडवर सनी जाधवचा चाकूहल्ल्यात खून झाला होता. अवघ्या दीड महिन्यात बुलढाण्यातील ही दुसरी खुनाची घटना ठरली आहे. त्यामुळे सुसंस्कृत मानल्या जाणाऱ्या बुलढाणा शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याची भीती सुज्ञ नागरिकांत व्यक्त होत आहे.