खदानीतील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू! पिकनिकचा आनंद झाला काळा...! शेलोडी शिवारातील दुर्घटना; खामगावचा २७ वर्षीय युवक जलसमाधीत
Jun 10, 2025, 14:05 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पिकनिकसाठी मित्रांसोबत गेलेल्या खामगाव तालुक्यातील २७ वर्षीय युवकाचा खदानीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना शनिवारी (दि. ८ जून) संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खामगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत युवकाचे नाव अरबाज मलिक मोहम्मद नदीम (वय २७, रा. जिया कॉलनी, खामगाव) असे आहे. तो आपल्या काही मित्रांसह पिकनिकसाठी खामगाव तालुक्यातील शेलोडी शिवारातील एका खदानी परिसरात गेला होता. यावेळी खदानीत साचलेल्या पाण्याचे आकर्षण वाटून त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने काही क्षणातच तो पाण्यात बुडाला.
मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य करून अरबाज याला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या दुर्दैवी घटनेमुळे जिया कॉलनी परिसरात शोककळा पसरली असून, हसत-खिदळत गेलेल्या तरुणाचा असा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.