

देऊळगावमहीच्या अग्नीतांडवातील युवकाचा मृत्यू; आग विझजवण्याचा प्रयत्न केला होता; नाकातोंडात धूर गेल्याने श्वास घ्यायला त्रास....
Mar 28, 2025, 08:40 IST
देऊळगाव मही (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चिखली-जालना राष्ट्रीय महामार्गावर देऊळगाव मही येथे चार दुकानांना लागलेल्या भीषण आगीच्या धुरामुळे किराणा व्यावसायिक संदीप श्रीराम शिंगणे (४०) यांचा काल २७ मार्च रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
देऊळगाव मही येथे २३ मार्च रोजी सकाळी शॉर्टसर्किटमुळे शिंगणे यांच्या किराणा दुकानाला आग लागली होती. तीव्रता वाढत असल्याचे पाहून संदीप शिंगणे यांनी स्वतःच्या दुकानातील आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, दाट धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तसेच संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसताच त्यांना धक्का बसला. स्थानिक ग्रामीण रुग्णालय व तेथून त्यांना जालना आणि नंतर संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होये. चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने काल २७ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला.