भरदिवसा दुकानात घुसून तरुणाला बेदम मारहाण; गल्ल्यातील ₹७ हजारांची रोकड लंपास, खामगावात तिघांविरुद्ध गुन्हा...

 
 खामगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरातील मेन रोड परिसरात भरदिवसा दुकानात घुसून एका तरुणाला बेदम मारहाण करत गल्ल्यातील सुमारे ₹७ हजारांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून खामगाव शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बुधवत

ADVT 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हरिहर घ्यार (वय २५, रा. संतविहार, खामगाव) हे २५ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आपल्या लहान भावासह दुकानासमोर बसले होते. त्यावेळी शिवानी विलास देशमुख (वय १९) तेथे आली. जुन्या वादाच्या कारणावरून तिने संतोष घ्यार यांच्याशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यानंतर शिवानीने दीपक जांभे (वय ३५) आणि विक्की पारधी (वय ३४, दोघेही रा. महाकाल चौक, खामगाव) यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तिघांनी मिळून दुकानात घुसून संतोष घ्यार यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

मारहाण सुरू असताना फिर्यादीचा लहान भाऊ त्यांना सोडविण्यासाठी पुढे आला. मात्र आरोपींनी त्यालाही मारहाण करत केस ओढून ढकलाढकली केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या गोंधळात आरोपींपैकी एकाने दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे ₹७ हजारांची रोकड काढून घेतली. त्यानंतर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर संतोष घ्यार यांनी खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.