आगीचा कहर! सहा एकर गहू जळून खाक; कचरा जाळण्याचा निष्काळजीपणा महागात

 
 मेरा खुर्द (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेरा खुर्द परिसरात सोमवारी (९ मार्च) दुपारच्या सुमारास लागलेल्या दोन वेगवेगळ्या आगींमध्ये गव्हाचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनांमध्ये एकूण सुमारे पाच ते सहा एकरांवरील उभे गव्हाचे पीक जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पहिली घटना दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मेरा खुर्द येथील शेतकरी गजानन गवई, बद्री गवई आणि रमेश गवई यांच्या शेतातील गव्हाच्या पिकाला अचानक आग लागली. खामगाव–जालना राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्याच्या कडेला आणि डिव्हायडरवर साचलेल्या कचऱ्याला आग लावण्यात आल्याने ती वाऱ्यामुळे शेतात पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण करत सुमारे पाच ते सहा एकरांवरील गव्हाचे उभे पीक भस्मसात केले.
या घटनेनंतर अवघ्या एका तासात दुसरी आग असोला येथे लागली. दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास विलास पुरुषोत्तम सुर्वे आणि प्रभाकर भास्कर सुर्वे यांच्या शेतातील विद्युत रोहित्रावर शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीत दोन ते तीन एकरांवरील गव्हाचे पीक जळून नष्ट झाले.
याशिवाय शिल्पा विलास सुर्वे यांच्या गट क्रमांक २६१ मधील बोअरवेलमधील मोटार, सर्व्हिस पाइप, वायर तसेच इतर साहित्यही आगीत जळून खाक झाले.
कापणीच्या उंबरठ्यावर असताना हातातोंडाशी आलेला घास आगीत जळून गेल्याने परिसरातील पाच शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेमुळे शेतकरी हतबल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.