चिंताजनक! मातृतीर्थ जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढले! ८ महिन्यांत तब्बल "एवढ्या" बहिणींची इज्जत लुटली! आकडा घाम फोडणारा.....

 
बुलडाणा(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)बुलडाणा जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा.. परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण देणाऱ्या छत्रपतींच्या मातोश्री राजमाता जिजाऊंचा जिल्हा...मात्र दुर्दैवाची बाब ही की आता हा जिल्हा गुन्हेगारांचा अड्डा बनतो आहे. दिवसेंदिवस या जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढत चालत आहे...याला केवळ पोलीस प्रशासनाला जबाबदार धरून चालणार नाही, समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे हा देखील चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. राज्यात सगळीकडे महिला अत्याचारांच्या घटना वर्तमान पत्रांच्या हेडलाईन्सचा विषय बनत चाललेल्या असताना त्यात बुलडाणा जिल्हा देखील मागे नाही हे खेदाने म्हणावे लागेल. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या ८ महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या ३ वर्षांपासून हा आलेख सातत्याने वाढतोच आहे. यंदा त्यात १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे..

 बुलडाणा जिल्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ८१ बहिणींची इज्जत लुटल्या गेली. तशी नोंद जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यात आहे. ८१ पैकी ८१ प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत बलात्काराच्या ६८ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी होती, यंदा त्यात १९ टक्यांची वाढ होणे हे चिंताजनक आहे.

विनयभंगाची प्रकरणीही मोठी....

दरम्यान बलात्कारापाठोपाठ महिला - मुलींची छेड काढणे अर्थात विनयभंगाच्या घटनाही वाढल्या आहेत. डोळा मारणे, वाईट उद्देशाने पकडणे, जवळ ओढणे, जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणे किंवा अश्लील चाळे करणे अशी प्रकरणे विनयभंग म्हणून नोंदवली जातात.

   शाळा, कॉलेज, ट्युशन क्लास अशा ठिकाणी असे प्रकार अधिक प्रमाणात होतात. विवाहित महिलांच्या बाबतीत देखील अशा घटना घडतात. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत विनयभंगाच्या २९७ घटनांची नोंद आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या गुन्ह्यांत २४ टक्क्यांची वाढ आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत विनयभंगाचे २४० प्रकरणे नोंदवण्यात आली होती...