

कार्यकर्ता डेंजरच..! चोला मंडलम फायनान्सचे ऑफिसच दिले पेटवून; हफ्ते थकले होते, फायनान्स वाल्यांनी गाडी केली होती जप्त....! मेहकरची घटना
Feb 5, 2025, 08:49 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वाहन जप्त केल्याच्या रागातून एकाने मेहकर येथील चोला मंडलम खासगी फायनान्सचे कार्यालय पेट्रोल टाकून पेटवून दिले. ४ फेब्रुवारीच्या दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
मेहकर येथील रहाटे कॉम्प्लेक्समध्ये चोला मंडलम खासगी फायनान्सचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मेहकर तालुक्यातील मुंदेफळचा सुभाष गणेश हिवरकर याने पीकअप वाहनाकरिता येथून कर्ज उचलले होते. कर्जाचे हप्ते थकल्याने त्याचे वाहन जप्त करून नांदेडला नेण्यात आले. यामुळे संतापून हा युवक पेट्रोलने भरलेली कॅन घेऊन फायनान्स कार्यालयावर धडकला. दुपारचा लंच टाइम झाल्याने कर्मचारी बाहेर होते. तर व्यवस्थापक आत होते. कार्यालयात पेट्रोल ओतून त्याने आग लावली. घटनेची माहिती समजताच नगरपालिकेचे अग्नीशमन दल तत्काळ पोहोचले. तातडीने आग विझविण्यात आली. मात्र कार्यालयातील काही साहित्य व कागदपत्रे जळाली. वेळीच आग विझविल्याने अनर्थ टळला. या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.