महिला दिन विशेष! महावितरणच्या रक्षणासाठी सरसावल्या महावितरणच्या दामिनी;कारवाईसाठी पोहचाणार थकबाकीदारांच्या दारात...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):वीज बिल भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या ग्राहकांकडील विजेचे बिल वसुल करण्याची जबाबदारी महावितरणच्या दामिनीने घेतली असून कारवाईसाठी थेट ग्राहकांच्या दारात पोहचत आहे़.त्यामुळे केवळ आपले घरच नाही‚तर महावितरणच्या रक्षणासाठीही महावितरणच्या दामीनी सरसावल्या आहेत़.

 घरी कोणी नाही म्हणून महावितरणच्या वसुली पथकाला दाद न देणारे ग्राहक आणि दहा हजारापेक्षा जास्त रूपयाची थकबाकी असणारे ग्राहक दामिनीच्या रडारवर आहे़.दामिनीकडून थेट वीज मीटर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.
 मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात आणि अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील चारही विभागात दामिनी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.एका दामिनी पथकात अतीरिक्त कार्यकारी ,उपकार्यकारी अभियंतासह १० महिला अभियंता,कर्मचारी सहभागी असून त्यांच्या सहकार्याला सुरक्षा रक्षक आणि कारवाई सुरू असलेल्या वितरणकेंद्रातील तंत्रज्ञाचा समावेश आहे.
 जिल्ह्यात घरगुती‚वाणिज्यिक‚औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांच्या थकबाकीचा एकुण आकडा १४७ कोटीवर पोहचला आहे़.त्यात बुलडाणा विभाग २९.कोटी ४७ लाख‚ खामगाव विभाग २९ कोटी ७२ लाख ‚मलकापूर ३१ कोटी ५४ लाख आणि मेहकर विभागातील ५७ कोटीचा समावेश आहे.तथापि यापैकी फक्त ९ कोटी ३९ लाखच वसुल झाले आहे.
 
कारवाईत अडथळा आणला ,तर गुन्हा होणार दाखल....
  विजबिल थकीत असलेल्या ग्राहकावर कारवाई सुरू केली आहे.कारवाई दरम्यान ग्राहकांनी अडथळा आणल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे तसेच, कारवाई दरम्यान ग्राहकांकडे वीज चोरी आढळल्यास त्या ग्राहकावर विद्युत कायद्याअंतर्गत वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे दामिनी पथकाला निर्देश देण्यात आले आहे.त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी महावितरणच्या दामिनी पथकाला सहकार्य करावे.