मोताळा बसस्थानकात प्रवासी महिलेच्या पर्सवर हातसफाई; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास..चोरट्यांना धाक उरला नाही का?
May 12, 2026, 11:41 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बसस्थानक परिसरातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी प्रवासी महिलेच्या पर्समधून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी मोताळा बसस्थानकात उघडकीस आली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील रहिवासी कल्पना दिनेश इंगळे या एका लग्नसमारंभानिमित्त मोताळा येथे आल्या होत्या. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्या मलकापूर-छत्रपती संभाजीनगर बसने परतीच्या प्रवासासाठी बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी आपल्या पर्सची तपासणी केली असता त्यामधील एक हजार रुपयांची रोख रक्कम, १७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत तसेच ७० गोलमणी असलेली दुसरी सोन्याची पोत असा मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेनंतर महिलेला मोठा धक्का बसला असून त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदविली. फिर्यादीत चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे २३ हजार रुपये नमूद करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या बाजारभावानुसार या दागिन्यांची वास्तविक किंमत अधिक असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.दरम्यान, बसस्थानक परिसरात नेहमीच मोठी गर्दी होत असल्याने चोरट्यांकडून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.