पत्नीपीडित नवऱ्याची पोलिसात धाव! जेवण करताना बायकोने मारले म्हणे; ती कधी काय करेल याचा नेमही नाही म्हणतो; चिखली पोलिस ठाण्यात अजब तक्रार...
Apr 17, 2025, 13:00 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... तुम्ही बातमीच जे शीर्षक वाचले ते अगदी खरं हाय..नेहमी नवऱ्याने बायकोला मारहाण केल्याच्या बातम्या तुम्ही वाचले असतील, तसे ते रोजचेच असते म्हणा..मात्र चिखली पोलीस ठाण्यात एका पत्नीपीडित नवऱ्याने धाव घेत स्वतःच्या बायकोची तक्रार केली आहे. जेवण करत असताना बायकोने मारल्याचे नवऱ्याचे म्हणणे आहे, याशिवाय बायको कधी काय करेल याचा नेमही नसल्याचे तक्रारदार नवऱ्याचे म्हणणे आहे..
तक्रारदार नवरा चिखलीतील गजानन नगरात राहतो. श्रीकांत गुलाबराव चव्हाण असे त्याचे नाव आहे. तक्रारीनुसार घटना १५ एप्रिलच्या सायंकाळची आहे. तक्रारदार चव्हाण यांचे २०२१ मध्ये लग्न झाले.त्यांच्या पत्नीचे माहेर बीबी असून पत्नीने त्यांच्यावर ४९८ दाखल केलेली आहे. सध्या केस कोर्टात चालू असून दोघे पती-पत्नी विभक्त राहतात. घटनेच्या दिवशी सायंकाळी श्रीकांत चव्हाण घरात जेवण करीत असताना अचानक पत्नी कांचन, तिची बहीण रिंकू राठोड घरात आल्या व श्रीकांत यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. श्रीकांत यांच्या आईला देखील मारहाण केल्याच्या तक्रारीत म्हटले आहे. श्रीकांत यांनी आरडा ओरड केली असता सासरा प्रकाश राठोड व साला हर्षद राठोड हा देखील आला व त्यांनी देखील मारहाण केली. या मारहाणीत डोळा सुजण्याचे श्रीकांत यांनी म्हटले आहे. पोलिसांनी तक्रारीवरून श्रीकांत यांची पत्नी, सासरा, साला व साळी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.