‘तू माझ्यासोबत का बोलत नाहीस?’ म्हणत अल्पवयीन मुलीचा पाठलाग; डोणगावात २० वर्षीय तरुणावर POCSOचा गुन्हा!
Sep 7, 2026, 11:18 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शाळेत जाणाऱ्या अवघ्या १५ वर्षे ११ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आंधुड येथे समोर आला आहे. याप्रकरणी पवन सुभाष अंभोरे (वय २० वर्षे, रा. आंधुड, ता. मेहकर) याच्याविरुद्ध डोणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी आरोपीने ‘तू माझ्यासोबत का बोलत नाहीस?’ असा सवाल केला. त्यावर मुलीने त्याच्याशी बोलायचे नसल्याचे स्पष्ट सांगितले.
मात्र, त्यानंतरही आरोपीने तिच्याशी बोलण्याचा आग्रह धरत तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मुलीने आपल्या वडिलांसोबत डोणगाव पोलीस स्टेशन गाठून तोंडी तक्रार दिली.या तक्रारीवरून ५ सप्टेंबर रोजी डोणगाव पोलिसांनी BNS कलम ७४, ७८ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ मधील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.