घर कोणाचं? वाद इतका टोकाला गेला की... वृद्ध वडिलांच्या डोळ्यावरच केला वार; शेगावात मुलगा-सुनेवर गुन्हा...
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाबुराव जानोजी घ्यारे (वय ६५, रा. बहादुरपुरा, ता. बाळापूर, जि. अकोला, सध्या गायत्री नगर, शेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की २९ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास घरात राहण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादादरम्यान राजेश घ्यारे यांनी फिर्यादी बाबुराव घ्यारे यांना शिवीगाळ करत, "तुम्ही येथून निघून जा, मला या घरात राहायचे आहे," असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे तर, हातातील लोखंडी वस्तूने बाबुराव घ्यारे यांच्या उजव्या डोळ्याच्या वर वार करण्यात आल्याने ते जखमी झाले आणि त्यांना रक्तस्त्राव झाला. त्यानंतर त्यांच्या पाठीवर व हातावरही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या गोंधळात आरोपी प्रतिभा घ्यारे यांनी फिर्यादींची पत्नी राजकन्या घ्यारे यांचे केस धरून त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.जखमी बाबुराव घ्यारे यांच्या जबाबासह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी मुलगा राजेश बाबुराव घ्यारे व सून प्रतिभा राजेश घ्यारे (रा. गायत्री नगर, शेगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ११८ (१), ११५ (२) व ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.