

कोण आहे तो जळका? शेगावात बसस्टँड समोर उभ्या दोन मॅजिक वाहनांना पेटवले...
Apr 10, 2025, 09:11 IST
शेगांव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथील बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन मॅजिक जाळून टाकण्यात आल्या. या वाहनांना अज्ञात जळक्या प्रवृत्तीच्या व्यक्तींनी आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत वाहनमालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
वाहनमालक अजहर खान आणि ज्ञानेश्वर लिप्ते यांनी नेहमीप्रमाणे आपली वाहने बसस्थानकासमोरील रस्त्यालगत उभी केली होती. मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी या वाहनांना पेटवून दिले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरात अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.