शाळेच्या पहिल्याच दिवसानंतर रात्री नेमकं काय घडलं? सकाळी उघड झालेलं दृश्य पाहून गाव हादरलं..चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू....!!
मृत बालकाचे नाव राज अभिषेक राठोड (वय ६) असे आहे. तो डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंट मध्ये शिक्षण घेत होता. २ जुलै रोजी शाळेच्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तो मोठ्या उत्साहाने शाळेत गेला होता. दिवसभरातील अनुभव आनंदाने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर रात्री तो आई आणि लहान बहिणीसोबत झोपला.
माहितीनुसार, ३ जुलैच्या मध्यरात्री उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता. त्याच वेळी घरात शिरलेल्या विषारी सापाने झोपलेल्या राजच्या पायाला दंश केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही वेळानंतर राजला तीव्र वेदना जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्याला डोणगाव येथील रुग्णालयात नेण्यासाठी रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर सकाळी घराची पाहणी करताना राज ज्या पलंगावर झोपला होता, त्याच्या शेजारी ठेवलेल्या खोक्यात विषारी साप लपून बसलेला आढळून आला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तत्काळ सापाला बाहेर काढल्याची माहिती मिळाली.शिक्षणाच्या नव्या प्रवासाची सुरुवात केलेल्या निष्पाप चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजगड गावात या घटनेनंतर शोककळा पसरली असून, प्रत्येकाच्या तोंडी या दुर्दैवी घटनेचीच चर्चा आहे.