कॉलेजला जाताना नेमकं काय घडलं? अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर २८ वर्षीय आरोपी अटक!

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संग्रामपूर येथील एका महाविद्यालय परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिला त्रास दिल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून मंगळवार, १ सप्टेंबर रोजी तामगाव पोलिस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. श्याम गुणवंत मारोडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी ट्युशनवरून महाविद्यालयाकडे जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून त्रास दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून १ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच तामगाव पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जीवन सोनवणे यांनी पथकासह आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलिसांकडून सुरू आहे.