चिखलीच्या अपार्टमेंटमध्ये नेमकं घडलं तरी काय? फ्लॅट पाहण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू; पोलिस तपास सुरु....

 
चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील शाहूनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय महिलेचा पाचव्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २४ जुलै रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मृत महिलेचे नाव वर्षा गुलाबराव चेके (वय ४५) असे आहे. चिखली पोलिस ठाण्यात मर्ग क्रमांक ४२/२६, कलम १९४ बीएनएस अन्वये नोंद करण्यात आली आहे.

बुधवत

ADVT 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडीसीसी बँकेच्या पाठीमागील परिसरात एका अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. वर्षा चेके या मनोरमा श्रीकृष्ण कुसळकर यांच्यासोबत सदर अपार्टमेंटमध्ये फ्लॅट पाहण्यासाठी गेल्या होत्या. दोघी पाचव्या मजल्यावरील फ्लॅटची पाहणी करत असताना अचानक वर्षा चेके खाली कोसळल्या.
घटनेनंतर उपस्थित नागरिक आणि बांधकामावरील मजुरांनी तातडीने त्यांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे परिसरात शोककळा पसरली.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.दरम्यान, वर्षा चेके या नेमक्या कोणत्या कारणामुळे पाचव्या मजल्यावरून खाली पडल्या, त्यांचा तोल गेला की या घटनेमागे अन्य काही कारण आहे, याचा सर्व बाजूंनी तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.