देवदर्शनाला गेले अन् मागे घडलं मोठं कांड!; परत येताच उघडं घर पाहून उडाली झोप, चोरट्यांनी नेमकं काय लंपास केलं? मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील घटना...
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी प्रल्हाद रामकिसन जाधव (वय ५०) हे २ जुलै रोजी सकाळी कुटुंबासह शेगाव येथे देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दरम्यान, ५ जुलै रोजी सकाळी शेजारी गणेश खोडके यांनी जाधव यांना दूरध्वनीवरून त्यांच्या घराचे कुलूप तुटले असून दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच जाधव कुटुंबीय तातडीने विठ्ठलवाडीत परतले. घराची पाहणी करताच त्यांना घरफोडी झाल्याचे स्पष्ट झाले.
चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यामध्ये ठेवलेल्या सुमारे ४० हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या तसेच २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुमके चोरून नेले. इतकेच नव्हे तर घराबाहेर उभी असलेली एमएच-२८-सीडी-०५०२ क्रमांकाची अंदाजे १० हजार रुपये किमतीची दुचाकी देखील चोरट्यांनी लंपास केली.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, चोरीचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील माहिती गोळा करण्यात येत असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत.