सोनोग्राफीसाठी रुग्णालयात गेली अन् उघडकीस आलं धक्कादायक गुपित! मलकापुरात १७ वर्षीय विवाहितेच्या प्रकरणात पतीसह तिघांवर पोस्को...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवतीचे वय १७ वर्षे ३ महिने असून ती मूळची नाशिकची आहे. सध्या ती मलकापूर येथे आई-वडिलांकडे वास्तव्यास आहे. तिच्या फिर्यादीनुसार, १० मे २०२५ रोजी ती अल्पवयीन असतानाच नातेवाईकांच्या संमतीने व पारंपरिक पद्धतीने तिचा विवाह शेख आफताफ शेख अब्दुला (वय २५) याच्याशी लावून देण्यात आला होता. विवाहानंतर ती पतीसोबत नाशिक येथे राहत होती.
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये अनेकवेळा शारीरिक संबंध झाल्याने ती गर्भवती राहिली. काही दिवसांपूर्वी ती माहेरी मलकापूर येथे आली होती. गर्भधारणेची खात्री करण्यासाठी आईसोबत उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीसाठी गेली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिचे वय अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आणले. संशय आल्याने त्यांनी तातडीने मलकापूर शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदवला. तपासात ती अल्पवयीन असतानाच विवाह झाल्याचे स्पष्ट झाल्याने शेख आफताफ शेख अब्दुला (पती), शेख हुसेन शेख धासू (सासरे) आणि आप्रोजाबी शेख हुसेन (सासू) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अप. क्र. ४७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४(२)(१), पोस्को कायद्याचे कलम ४ व ६ तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाचे कलम ९ व १० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीष बेले करीत आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलींचे विवाह आणि त्यानंतर घडणाऱ्या अशा घटनांविरोधात आरोग्य विभाग व पोलिस यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे हे प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे.