पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेले अन् काळाचा घाला; विहिरीत पडून ५८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू! खामगाव तालुक्यातील अटाळी हळहळले...
ही माहिती मिळताच रामेश्वर पातोंड, संदीप मारखेडे, अनंता बावस्कार, अमोल पातोंड यांच्यासह इतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संदीप मारखेडे, विठ्ठल टेकाळे आणि शेख निसार यांनी विहिरीत उतरून एकनाथ पातोंड यांना पाण्यातून बाहेर काढले.यानंतर त्यांना तातडीने अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर एकनाथ पातोंड यांना मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, शेतातील विहिरीजवळ पाय घसरल्याने एकनाथ पातोंड हे पाण्यात पडले आणि बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, घटनेची नेमकी परिस्थिती पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली असून, पुढील तपास सुरू आहे.