औषध फवारणीसाठी शेतात गेले अन् काळाने घाला घातला; देऊळगाव राजातील ४५ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू... शेतकऱ्यांनो जरा जपूनच...!
Sep 15, 2026, 10:14 IST
देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना देऊळगाव राजा तालुक्यातील जवळखेड शिवारात १४ सप्टेंबर रोजी घडली. मधुकर कडुबा कायंदे (वय ४५, रा. उंबरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर कायंदे हे जवळखेड शिवारातील शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास शेतालगत असलेले शरद शेषराव कायंदे यांनी मधुकर यांच्या भावाला फोन करून त्यांना साप चावल्याची माहिती दिली.
ही माहिती मिळताच रामेश्वर कडुबा कायंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मधुकर कायंदे हे शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रामेश्वर कायंदे आणि शरद कायंदे यांनी त्यांना मोटारसायकलवरून तातडीने देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मधुकर कायंदे यांना मृत घोषित केले. शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अचानक सर्पदंशाने मृत्यू झाल्याने उंबरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेबाबत रामेश्वर कडुबा कायंदे यांच्या तोंडी माहितीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग क्र. ३७/२०२६) करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.