कॉलेजला जाते म्हणत घराबाहेर पडली अन् बेपत्ता! व्हॉट्सॲपवर ‘मी लग्न केले आहे’चा मेसेज; मलकापूरच्या २० वर्षीय युवतीप्रकरणी तरुणावर अपहरणाचा गुन्हा...

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील कोलते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाते असे सांगून घराबाहेर पडलेली २० वर्षीय युवती बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, युवतीने वडिलांच्या व्हॉट्सॲपवर ‘मी लग्न केले आहे, मी चांगली आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी खुश आहे,’ असा संदेश पाठविल्याचे समोर आले आहे. तसेच तिच्या व्हॉट्सॲप प्रोफाइलवरील छायाचित्रात एका तरुणासोबत ती दिसून आल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दसरखेड, ता. मलकापूर येथील विनोद सोपान एकडे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या पुतणी दिक्षा राजू एकडे (वय २०) ही १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता कोलते इंजिनिअरिंग कॉलेज, मलकापूर येथे गेली होती. मात्र, कॉलेज सुटल्यानंतरही ती सायंकाळपर्यंत घरी परतली नाही.

नातेवाईकांनी तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद असल्याचे आढळले. त्यामुळे कुटुंबीयांनी कॉलेजमध्ये चौकशी केली. त्यावेळी दिक्षा दुपारी सुमारे १ वाजता वडील आजारी असल्याचे सांगून कॉलेजमधून निघून गेल्याची माहिती मिळाली.

यानंतर नातेवाईकांनी दिक्षाचा विविध ठिकाणी शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, दिक्षाने तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपवर ‘मी लग्न केले आहे, मी चांगली आहे, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी खुश आहे,’ असा संदेश पाठविल्याचे फिर्यादीत नमूद आहे.१८ सप्टेंबर रोजी दिक्षाने तिच्या मावशीला फोन केला. यावेळी ती रडत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर तिच्या व्हॉट्सॲप प्रोफाइलवरील छायाचित्र नातेवाईकांच्या निदर्शनास आले. या छायाचित्रात दिक्षासोबत अक्षय विठ्ठल चिकटे, रा. वडोदा, ता. मलकापूर हा तरुण दिसत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दिक्षाचे अज्ञात कारणासाठी अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत तिचा शोध घेण्याची मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली. या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अक्षय विठ्ठल चिकटे याच्याविरुद्ध अप. क्र. ६९५/२०२६, कलम १४०(३) बीएनएसएसनुसार गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे करीत आहेत.