

"गँगस्टर है हम.. जान से मार देंगे!" गावठी कट्टा दाखवून २५ हजार मागितले; परप्रांतीय मजुरांना दिली पुलाचे काम बंद करण्याची धमकी! खामगावची घटना...
Mar 8, 2025, 09:05 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुलाचे बांधकाम करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवत २५ हजार रुपये मागण्यात आले. सकाळपर्यंत पैसे दिले नाही तर पुलाचे बांधकाम बंद करा. "हम गँगस्टर है, जान से मार देंगे" अशी धमकीही देण्यात आली. खामगाव तालुक्यातील लोखंडा लाखनवाडा रस्त्यावरील मजुरांच्या कॅम्पस मध्ये हा प्रकार घडला. दरम्यान या प्रकरणाची तक्रार दिल्यानंतर स्वतःला गँगस्टर म्हणवून घेणाऱ्या ३ तरुणांवर खंडणीसह आर्म ॲक्ट चे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पंकज रुपेश सुटे, मनोज काशीराम हेलोडे व अनिकेत समाधान हिवराडे अशी आरोपींची नावे आहेत. प्राप्त माहिती नुसार खामगाव तालुक्यातील लोखंडा– लाखनवाडा रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. या पुलाचे बांधकाम करण्यासाठी कंपनीने परप्रांतीय मजूर कामासाठी आणले आहेत. मजुरांचा कॅम्पस लोखंडा येथील गजानन वानखेडे यांच्या शेतात तयार करण्यात आलेला आहे. आरोपी तरुण ६ मार्चला मजुरांच्या कॅम्पस मध्ये शिरले. तिथे मिक्सर मशीन ऑपरेटर अनुज कुमार सिंग, जितेंद्र सिंग ( रा.गोपालगंज, बिहार) यांना आरोपी पंकज सुटे यांने गावठी कट्टा दाखवला. उद्या सकाळपर्यंत काम बंद करा. काम सुरू ठेवायचे असेल तर सकाळपर्यंत २५ हजार रुपयांची व्यवस्था करा. "जान से मार देंगे, हम गँगस्टर है " अशी धमकी दिली. अशी तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना तातडीने अटक केली आहे..