गव्हाला पाणी देणे बेतले जिवावर ; ढासळवाडीत शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू...
Feb 18, 2026, 11:57 IST
रायपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ढासळवाडी येथील एका शेतकऱ्याचा शेतात गव्हाला पाणी देताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १६ फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. मृत शेतकऱ्याचे नाव संतोष दगडू दळवी (वय ४७) असे आहे.
संतोष दळवी हे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ६ वाजता स्वतःच्या शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शेत परिसरात शोध घेतला असता शेताच्या मधोमध त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या तोंडाला व पायाला जखमा झालेल्या असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह धाड ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी संतोष दळवी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने दळवी कुटुंबावर दुःखा चा डोंगर कोसळला आहे.