हुंड्याच्या पैशासाठी सुरू होता छळ...? अखेर त्या एका फोननंतर घडलं काळजाचा ठोका चुकवणारं कृत्य; पतीसह चौघांवर गुन्हा! मेहकर शहरातील बालाजी नगरातील घटना
मृत वैष्णवी गणेश मेरत (वय २६) हिचा विवाह २२ एप्रिल २०२२ रोजी झाला होता. तिचे वडील रतन श्रीकिसन पागोरे (रा. बारई, ता. मेहकर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहानंतर चारचाकी वाहन खरेदीसाठी आर्थिक मदत, वाहन कर्जाचे हप्ते, नातेवाईकांच्या लग्नाचा खर्च तसेच इतर कारणांसाठी माहेरहून वारंवार पैसे आणण्याचा दबाव तिच्यावर टाकण्यात येत होता. पैसे न आणल्यास मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी वैष्णवीकडे तब्बल १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम न आणल्यास तिला मारहाण करण्यात येत होती आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. २३ जून रोजी सकाळी वैष्णवीने वडिलांशी दूरध्वनीवर संपर्क साधून सासरी होत असलेल्या त्रासाची व्यथा मांडली. मात्र, त्या फोननंतर काही वेळातच तिच्या आत्महत्येची बातमी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या प्रकरणी पती गणेश रामेश्वर मेरत, सासरे रामेश्वर मेरत, सासू मीना मेरत आणि नणंद मोहिनी जाधव (मेरत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत.दरम्यान, या दुर्दैवी घटनेत वैष्णवीचा अवघा तीन वर्षांचा मुलगा आयांश मातृछत्राला मुकला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हुंड्याच्या कथित छळामुळे आणखी एका तरुण विवाहितेचा बळी गेल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे.