UPDATE कहानी में ट्विस्ट! देऊळगाव राजातील 'अपहरण' नाट्याचा अखेर पर्दाफाश! भरदिवसा सराफा व्यापाऱ्याला इनोव्हात कोंबून नेले अन् जिल्हाभर पोलिसांची उडाली धावपळ!

 साखरखेर्ड्यात कार अडवताच समोर आले भलतेच सत्य; तेलंगणा "एलसीबी"चे कनेक्शन उघड, सोने-चांदीच्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण काय?

 
 देऊळगाव राजा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : भरदिवसा दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून एका सराफा व्यापाऱ्याला चार-पाच जणांनी जबरदस्तीने इनोव्हा कारमध्ये बसवले... 'आम्ही एलसीबी पोलीस आहोत' असे सांगत व्यापाऱ्याला घेऊन गेले... काही क्षणांतच शहरात अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली... नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली... जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा कामाला लागली... संशयित इनोव्हाचा शोध सुरू झाला... अखेर साखरखेर्ड्यात कार अडविण्यात आली आणि त्यानंतर जे सत्य समोर आले, त्याने या संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली! ज्या घटनेला सुरुवातीपासून अपहरण समजले जात होते, ती प्रत्यक्षात तेलंगणा राज्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी केलेली कारवाई असल्याचे उघड झाले! सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीतील कथित गैरव्यवहाराच्या तपासासाठी देऊळगाव मही येथील सराफा व्यापारी अनिरुद्ध मधुकर शिंगणे यांना तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आज,सोमवारी (२ नोव्हेंबर) घडलेल्या या घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात काही तास अक्षरशः खळबळ उडवून दिली.

देऊळगाव मही येथील अनिरुद्ध मधुकर शिंगणे (वय ३२ वर्षे) हे सराफा व्यावसायिक आहेत. त्यांचे सोने-चांदीचे दुकान असून, ते जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायातही सक्रिय आहेत. सोमवारी ते एका जमिनीच्या व्यवहारासाठी देऊळगाव राजा शहरात आले होते. दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयात त्यांचे काम होते. मात्र, याच ठिकाणी त्यांच्यासोबत असे काही घडणार आहे, याची त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना कल्पनाही नव्हती.

दुपारी सव्वा एक वाजता नेमके काय घडले?

दुपारी साधारण सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अनिरुद्ध शिंगणे हे दुय्यम निबंधक कार्यालयासमोर उभे होते. त्याचवेळी सिल्व्हर रंगाची इनोव्हा कार तेथे आली. कारमधून चार ते पाच व्यक्ती उतरल्या. त्यांनी अनिरुद्ध यांना बोलावून घेत आपण एलसीबी पोलीस असल्याचे सांगितले. चौकशीच्या नावाखाली त्यांना सोबत येण्यास सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तींनी अनिरुद्ध यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि इनोव्हा तेथून निघून गेली. हा प्रकार अनिरुद्ध यांचे मामा तथा शिक्षक चेके यांनी प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती आहे. भरदिवसा, तेही वर्दळीच्या दुय्यम निबंधक कार्यालयासमोरून एका व्यापाऱ्याला अशाप्रकारे घेऊन गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अनोळखी व्यक्तींनी व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची चर्चा सुरू झाली. काही वेळातच ही माहिती देऊळगाव मही आणि देऊळगाव राजा परिसरात पसरली.

नातेवाईक पोलीस ठाण्यात, अन् जिल्हाभर सुरू झाला इनोव्हाचा शोध!

अनिरुद्ध शिंगणे यांना अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने घेऊन गेल्याचे समजताच नातेवाईक आणि देऊळगाव मही येथील नागरिकांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.
एका व्यापाऱ्याला भरदिवसा वाहनातून पळवून नेल्याचा संशय असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानंतर जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षातून सर्व पोलीस ठाण्यांना संबंधित सिल्व्हर रंगाच्या इनोव्हा कारची माहिती देण्यात आली.संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर पोलिसांनी हालचाली सुरू केल्या. बुलढाणा जिल्ह्यासोबतच शेजारील जालना जिल्ह्यातील मार्गांवरही वाहनाचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान, संबंधित इनोव्हा शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्याचीही माहिती समोर आली होती.

दुपारी चार वाजता साखरखेर्ड्यात 'ट्विस्ट'; इनोव्हा अडवली अन् अपहरणाच्या चर्चेला मिळाले वेगळेच वळण!

एकीकडे अपहरणाच्या संशयामुळे पोलीस यंत्रणा धावपळ करीत असतानाच दुसरीकडे संशयित इनोव्हाचा शोध सुरू होता. अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित इनोव्हा कार अडविण्यात आली.मात्र, कारमधील व्यक्तींची ओळख समोर आल्यानंतर या प्रकरणाचे संपूर्ण चित्रच बदलले!
अनिरुद्ध शिंगणे यांना घेऊन जाणारे व्यक्ती अपहरणकर्ते नसून तेलंगणा राज्यातील एलसीबी पोलीस असल्याचे समोर आले. तेलंगणा पोलिसांनी एका प्रकरणाच्या तपासासाठी अनिरुद्ध यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. त्यामुळे गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या अपहरणाच्या चर्चेमागील वास्तव स्पष्ट होऊ लागले.

सोने-चांदीच्या कथित गैरव्यवहाराचे कनेक्शन; तेलंगणा पोलिसांना नेमका कोणता तपास करायचा आहे?

प्राथमिक माहितीनुसार, तेलंगणा राज्यात सोने-चांदीच्या खरेदी-विक्रीतील कथित गैरव्यवहाराच्या एका प्रकरणाचा तपास सुरू आहे. याच तपासाच्या अनुषंगाने तेलंगणा एलसीबीच्या पथकाने देऊळगाव मही येथील सराफा व्यापारी अनिरुद्ध शिंगणे यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, संबंधित प्रकरणाचे नेमके स्वरूप काय आहे? किती रकमेचा कथित गैरव्यवहार आहे? अनिरुद्ध शिंगणे यांचा या प्रकरणाशी नेमका कोणत्या स्वरूपाचा संबंध असल्याचा संशय आहे? त्यांना कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार ताब्यात घेण्यात आले? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.

स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना नव्हती? त्यामुळेच उडाली एवढी धावपळ!

या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई करण्यापूर्वी स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना दिली नसल्याची माहिती समोर येत आहे.एका राज्यातील पोलीस दुसऱ्या राज्यात येऊन कारवाई करतात आणि स्थानिक पोलीस यंत्रणेला त्याची माहिती नसल्याने अपहरणाचा संशय निर्माण होतो, अशी परिस्थिती या घटनेत पाहायला मिळाली. यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेची काही तास धावपळ झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्याशी चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतला.

साखरखेर्डा पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया; आता पुढे काय?

वृत्त लिहिपर्यंत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तेलंगणा एलसीबी पथकाकडून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. देऊळगाव राजा पोलिसांकडून या प्रकरणाची सविस्तर अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नव्हती.त्यामुळे अनिरुद्ध शिंगणे यांना पुढील चौकशीसाठी तेलंगणात नेण्यात येणार का, संबंधित प्रकरणात नेमके कोणते आरोप आहेत आणि पुढील कारवाई काय होणार, याबाबत स्पष्टता होणे बाकी आहे.