

UPDATE देऊळगावराजा पोलिस हत्याकांड! आरोपी बाब्या म्हस्केसह चारही आरोपी उद्यापर्यंत पोलिस कोठडीत... एसडीपीओ मनिषा कदम करीत आहेत बारकाईने तपास! हत्याकांडात वापरलेला रुमाल जप्त....
Apr 7, 2025, 17:40 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० मार्चला गुढीपाडव्याच्या दिवशी अख्ख्या बुलडाणा जिल्ह्यासह पोलिस दलाला हादरवून सोडवणारे पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के हत्याकांड देऊळगावराजा तालुक्यात उघडकीस आले होते. पोलिसांनी घटनेच्या दिवशीच ४ आरोपींना अटक केली होती. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने गिरोली खुर्दच्या बाब्या म्हस्के (याला बाबासाहेब म्हणू नका, असे अनेक सुज्ञ वाचकांचे म्हणणे आहे) याने जालन्याच्या दिलीप वाघ उर्फ टायगर ला सुपारी देऊन ज्ञानेश्वर म्हस्के यांचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. दरम्यान या प्रकरणी आधी आरोपी ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत होते..पोलिसांना या घटनेच्या खोलात शिरून प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणे असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे पुन्हा आरोपींच्या कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार पुन्हा ८ एप्रिलपर्यंत आरोपी पोलिसांच्या कोठडीत राहणार आहेत.. देऊळगाव राजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम या प्रकरणाचा अतिशय बारकाईने तपास करीत आहेत..
आरोपींनी ज्ञानेश्वर म्हस्के यांचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर म्हस्के यांच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर तो मृतदेह आरोपींनी ठेवला होता. कार देऊळगाव राजा सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूलच्या समोरील वनविभागाच्या जागेत ठेवून आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी सर्वात आधी बाब्या म्हस्के याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्याने खुनाची कबुली दिल्यानंतर उर्वरित तिन्ही आरोपींना पोलिसांनी घटनेच्या दिवशी ताब्यात घेतले होते.
बाब्या म्हस्के याने अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने टायगरला ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या हत्येची सुपारी ४ महिने आधीपासूनच दिली होती.. टायगर ने घटनेच्या दिवशी कमलाकर वाघ आणि बबन शिंदे ही त्याची दोन माणसे बाब्याच्या सोबत दिली होती. त्या तिघांनी मिळून ज्ञानेश्वर म्हस्के यांचा गळा आवळून खून केला होता..दरम्यान या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने पोलिसांकडून करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी हा तपास एसडीपीओ मनिषा कदम यांच्याकडे सोपवला आहे..
आरोपींची पोलीस कोठडी चौकशी सुरू आहे, पोलिसांनी आरोपींकडून खून करण्यासाठी वापरलेला रुमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आणखी एखादा आरोपी वाढण्याची शक्यता असली तरी अद्याप तसे ठोस पुरावे पोलिसांना मिळाले नाहीत. या प्रकरणी ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या जवळच्या लोकांची सुद्धा चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे..पोलिस आरोपीचे सीडीआर देखील तपासत आहेत..