गणेश विसर्जनाच्या धामधुमीत दुर्दैवी घटना; युवकाचा नदीत पडून मृत्यू; संग्रामपूर तालुक्यातील घटना...

 
 संग्रामपूर (अकोला-बुलडाणा सीमारेषा) : तालुक्यातील काकनवाडा बु. येथे गणेश विसर्जनाच्या उत्साहात दुर्दैवी घटना घडली. शेतातून परतणाऱ्या सिद्धार्थ रामदास भिलंगे (वय ३५) या युवकाचा वाण नदीपात्रात पाय घसरून मृत्यू झाला.

ही घटना ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. शेतकाम आटोपून सिद्धार्थ भिलंगे हे घरी परतत असताना नदीपात्रातून जाताना त्यांचा तोल गेला. अचानक पाण्यात पडल्याने गावकऱ्यांनी तत्काळ मदत केली. त्यांना बाहेर काढून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.सिद्धार्थ यांच्या पश्चात पत्नी, मुलगी तसेच आई-वडील असा आप्तपरिवार असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.