दुर्दैवी...मेहकर शहरात हळहळ! गर्मी होत असल्याने गौरव कुलरमध्ये पाणी टाकायला गेला अन् जीव गेला...

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर शहरातील रामनगरात घडलेल्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. ऐन २४ वर्षाच्या उमेदीच्या वयात गौरव शिंदे या तरुणावर काळाने झडप घातली.. कुलरमध्ये पाणी टाकत असताना करंट लागून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले..
 मिळालेल्या माहितीनुसार गौरव शिंदे हा तरुण दुपारी दोन वाजेच्या सुमारास जेवण करत होता. घरात गर्मी होऊ लागल्याने तो चालू कुलर मध्ये पाणी टाकण्यासाठी उठला..मात्र याचवेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत गौरवची प्राणज्योत माळवली होती. तरुण वयात झालेल्या या आकस्मिक मृत्यूमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..
कुलर बंद करून टाका पाणी...
या घटनेमुळे कुलरची सुरक्षितता आणि इतर प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. शक्यतोवर लोखंडी कुलर घराच्या बाहेर खिडकीत ठेवावे. लहान मुलांचा त्याला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. कुलर मध्ये पाणी टाकत असताना कुलर बंद करावे.. कुलरच्या आतील पंख्यामुळे काही वायर कटिंग तर झाले नाही ना? याची वेळोवेळी तपासणी करावी..