दुर्दैवी! गवंढाळा गावात एकाच दिवशी दोन विवाहित तरुणांच्या चिता पेटल्या; तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक बांधकाम मजुरांचा अपघातात मृत्यू;
Jun 23, 2025, 15:43 IST
खामगाव ( भागवत राऊत, बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
खामगाव तालुक्यातील गवंढाळा गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका भीषण अपघातात दोन विवाहित तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून तिसरा तरुण जीवसंघर्ष करीत आहे. शनिवारी सायंकाळी लाखनवाडा - आंबेटाकळी मार्गावर मालवाहू वाहनाने तीन बांधकाम मजुरांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्दैवी घटना घडली.
अपघातात राजू धोंडू सरदार (३५) व विजय आनंद तायडे (३४) या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून किशोर गणेश तायडे (२४) हा गंभीर जखमी आहे. तिघेही एमएच २८ एक्स ४४७४ क्रमांकाच्या दुचाकीने कामावरून गावाकडे परतत असताना एमएच २८ बी ६३८७ या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातामुळे गवंढाळा गावावर शोककळा पसरली आहे. मृतांपैकी राजू सरदार मागे १२ वर्षांचा मुलगा व ३ वर्षांची मुलगी असा परिवार ठेवून गेला आहे. विजय तायडे यांच्या पश्चात सहा वर्षांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी आहे. एका दिवसात दोन तरुण कर्त्यांंच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोन्ही कुटुंबातील चिमुकल्यांचे पित्याचे छत्र हरपले आहे.
जखमी किशोर तायडेवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर लाखनवाडा-आंबेटाकळी मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
गावात एकाच दिवशी पेटलेल्या दोन चिता आणि तिसऱ्याच्या जीवासाठी सुरू असलेली झुंज या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळून गेला आहे.