दुर्दैवी..! विहीर बांधकामावर पाणी टाकतांना तोल गेला; विहिरीत पडून संगणक परिचालकाचा मृत्यू; संग्रामपूर तालुक्यातील घटना...

 
 संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील निवाना शेतशिवारात स्वतःच्या शेतातील विहीर बांधकामावर पाणी टाकत असताना संग्रामपूर दुय्यय निबंधक कार्यालयातील संगणक परिचालक सुनील मोहे (४४) यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. १३ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ही घटना घडली.
 दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज आटोपल्यानंतर सुनील मोहे आपल्या निवाना शेत शिवारातील शेतात नवीन विहिरीच्या सिमेंट काँक्रिट बांधकामावर पाणी टाकत होते. तोल जावून ते विहिरीत पडले. मोहे विहिरीत पडल्याचे पाहताच एका नागरिकाने नातेवाइकांसह ग्रामस्थांना माहिती दिली. तोपर्यंत पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. तब्बल चार तास नागरिकांनी त्यांना विहिरीत शोधण्याचे प्रयत्न केले. शेवटी मध्यरात्री एक वाजता मोहे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगला. शवविच्छेदन केलानंतर १४ फेब्रुवारीला मोहे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.