दुर्दैवी..!!धाड येथे अन्नातून विषबाधा; एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू, आईसह एकीची प्रकृती चिंताजनक....
Apr 7, 2026, 11:57 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याची भीषण घटना घडून एकाच कुटुंबातील तीन लहानग्या बहीण-भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत आईसह एका चिमुकलीवर सध्या बुलढाणा येथील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४), मशिरा मोहंमद वसीम जमदार (वय ७) आणि फातिमा मोहंमद वसीम जमदार (वय ८) यांचा समावेश आहे. तर आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४) व अश्मिरा वसीम जमदार (वय ३) या दोघींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहंमद वसीम जमदार यांच्या कुटुंबातील पाचही सदस्यांना रविवारी रात्रीपासून पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास जाणवू लागला. सोमवारी, ६ एप्रिल रोजी सकाळी प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अली व मशिरा या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर आई व दोन मुलींना पुढील उपचारासाठी बुलढाण्यात हलविण्यात आले. सायंकाळी उपचार सुरू असतानाच फातिमा हिचाही मृत्यू झाला, तर अश्मिराची प्रकृती सध्या सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, नेमके कारण शोधण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे धाड परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.