भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू; वडनेर भोलजीजवळ भीषण घटना

 
 वडनेर भोलजी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): – भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी वडनेर भोलजी परिसरात घडली. मृत व्यक्तीची ओळख सुभाष सुरेश उंबरकर (वय ४५, रा. धानोरा, ता. नांदुरा) अशी झाली आहे.

१२ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सुभाष उंबरकर हे एमएच २८ बीएस ७४२८ या क्रमांकाच्या दुचाकीवरून वडनेर भोलजी परिसरातील पंजाब हरियाणा हॉटेल येथे भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. काम आटोपून घरी परतत असताना मलकापूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की सुभाष उंबरकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी प्रफुल्ल अशोक उंबरकर (वय २७, रा. धानोरा) यांनी वडनेर भोलजी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात अपघात क्रमांक ३३७/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) बी एन एस व कलम १८४ मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.