दुचाकींची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी !

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा रोडवरील ग्राम निंबारी नजीक असलेल्या राजवीर पेट्रोल पंपासमोर दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

या अपघातात शेख जावेद शेख हनीफ (वय ३५, रा. राजूर, ता. बुलढाणा) यांचा जागीच मृत्यू झाला. शेख जावेद हे एमएच-२८-के-४३९५ क्रमांकाच्या दुचाकीवरून मलकापूर येथील डिलक्स फर्निचर येथे कारपेंटरचे काम आटोपून राजूरकडे जात होते.
दरम्यान, निंबारी फाट्यानजिक बुलढाणा रोडवरील राजवीर पेट्रोल पंपासमोर एमएच-१९-सीएस-६०२ क्रमांकाच्या दुचाकीवरून दाताळाकडून मलकापूरकडे येणाऱ्या वाहनाशी त्यांची समोरासमोर धडक झाली.
या धडकेत दुसऱ्या दुचाकीवरील सागर सुधीर झांबरे (वय ३६, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पत्रकार विलास खर्चे, सोनू राजपूत, तुषार पाचपोळ, रोशन देशमुख, गोलू गुडगिल्ला, जयसिंग राठोड यांच्यासह नागरिकांनी तत्काळ जखमींना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, अॅड. हरीश रावळ, नगरसेवक जाकीर मेमन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. गंभीर जखमी सागर झांबरे यांना पुढील उपचारासाठी मलकापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांची पुढील कारवाई सुरू असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.