शेगावात दुचाकींची भीषण धडक; तिहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर...
Mar 12, 2026, 10:30 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील अकोट रोडवरील झाडेगाव फाट्याजवळ बुधवारी (दि.११) सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दुचाकींचा भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोट रोडवर झाडेगाव फाट्याजवळ तीन दुचाकी एकमेकांवर जोरात आदळल्याने हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत सोहम दिलीप शेगोकार (रा. भीमनगर, शेगाव) हा युवक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात भारत विश्राम वानखडे (रा. मिलिंदनगर, शेगाव) आणि राहुल प्रकाश शेगोकार (रा. झाडेगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, दुचाकींचा हा तिहेरी अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.