अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; चौघांना अटक, लोकेशन देणारा मालकही गजाआड

 
 किनगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : किनगाव राजा पोलिसांनी अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत दोन टिप्पर तसेच लोकेशन देण्यासाठी वापरली जाणारी स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण १८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता हिवरखेड–पूर्णा रोडवर एमएच-२८-बीबी-६११२ क्रमांकाचा टिप्पर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना पोलिसांनी पकडला. त्यानंतर सकाळी साडेतीनच्या सुमारास किनगाव राजा बसस्थानकाजवळ दुसरा टिप्पर (एमएच-२८-बीबी-९०४८) पकडण्यात आला. या वाहनात दोन ब्रास वाळू आढळून आली. या कारवाईत वाहनासह एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी टिप्पर मालक संतोष गबाजी भुमकर (३५) आणि चालक भरत संजय राठोड (२३, रा. ताडशिवणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणात लोकेशन देण्यासाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार (एमएच-२८-बीक्यू-६७४९) जप्त करण्यात आली. या कारमध्ये असलेले टिप्पर मालक समाधान नारायण मोरे आणि चालक सचिन नामदेव राठोड (२६, रा. ताडशिवणी) यांनाही पोलिसांनी अटक केली.
दोन्ही प्रकरणांत पोहेकॉ विश्वास काकड यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोहेकॉ अनिल नागरे करीत आहेत.