अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर जप्त; महिला अधिकाऱ्यांची धडक कारवाई...
Updated: Dec 2, 2025, 14:37 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खडकपूर्णा नदी व नदीपात्रातून होणाऱ्या अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी महसूल विभागाने कंबर कसली असतानाही रेती तस्कर मात्र प्रशासनाला चकवा देत अवैध वाहतूक सुरूच ठेवत आहेत. मात्र, 29 नोव्हेंबर रोजी रात्री महसूल पथकाने केलेल्या तात्काळ कारवाईत दोन अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहेत.
तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात मोठे रेती उपसा केंद्र म्हणून खडकपूर्णा नदीपात्र आणि धरण ओळखले जाते. याठिकाणी अवैध उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक सातत्याने दक्ष राहत असल्याचे दिसून येते. विविध विभागांचे अधिकारी निवडणूक कामात गुंतलेले असतानाच अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती नायब तहसीलदार सायली जाधव यांना मिळताच त्यांनी तत्काळ हालचाल केली.पहिल्या कारवाईत अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत एक टिप्पर थांबवून रेतीसह जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत शहरापासून काही अंतरावरील सावखेड भोई येथे आणखी एक टिप्पर पकडून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला.
सदर कारवाई तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सायली जाधव, सेवक विठ्ठल हरणे आणि महसूल पथकाने केली. महिला अधिकाऱ्यांच्या तात्परतेमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
