देऊळगाव राजातील मंदिरे फोडणारे दोन चोरटे गजाआड; १.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा व देऊळगाव राजा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल...
दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी चौडेश्वरी मंदिराचे सचिव विनोद शंकर पन्हाळे यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात नमूद करण्यात आले की, २१ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चौडेश्वरी मंदिराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पंचधातूच्या मूर्ती, तसेच धोंडीराम महाराज मठ व कोतवाडा मोरोती मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम असा एकूण ५५ हजार ९९५ रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देऊळगाव राजा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी व तांत्रिक विश्लेषण करून, गोपनीय माहितीच्या आधारे २७ जानेवारी २०२६ रोजी आरोपी चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना त्यांना रंगेहाथ पकडले.
शेख अन्सार ऊर्फ छोट्या शेख अजमोद्दीन (वय २५, रा. बाभुळखेड, ह.मु. दत्त नगर, देऊळगाव राजा) व अरविंद लक्ष्मण शिंदे (वय ३५, रा. संजय नगर, देऊळगाव राजा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तपासात आरोपींनी साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याचेही उघड झाले असून, याच चोरीच्या मोटारसायकलचा वापर करून मंदिर चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून पंचधातूची देवीची मूर्ती (६ किलो ८१० ग्रॅम) – ₹४,०००, चांदीच्या तीन पाटल्या – ₹६००, चांदीचा लहान टोप – ₹१,०००, चांदीचा कंबरपट्टा – ₹२,०००, चांदीचा मोठा टोप – ₹३०,०००, चांदीची दत्ताची मूर्ती – ₹३,०००, चांदीच्या दोन मासोळ्या – ₹३,०००, एस.पी. होंडा शाईन मोटारसायकल – ₹८०,००० असा एकूण १ लाख २३ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) व अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोउपनि. प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, पोको. निलेश राजपूत, मपोको. पूजा जाधव, चापोहेकॉ. समाधान टेकाळे, तसेच देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ब्रह्मा गिरी, पोहेका राम गीते, प्रवीण डोईफोडे, विजय दराडे व त्यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.
