दोन शिक्षकांनीच लंपास केल्या लोखंडी सळ्या; घाटबोरी येथील घटना, गुन्हा दाखल...
जानेवारी 2025 पासून वरुड–जनूना सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी लोखंडी सळ्या व इतर साहित्य घाटबोरी घाटाखाली, वरुड रस्त्यालगत ठेवण्यात आले होते. या साहित्याचा वापर सुरू असताना मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर साहित्य चोरीला जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी गुप्तपणे लक्ष ठेवले असता दोन व्यक्ती साहित्य चोरून नेत असल्याचे दिसून आले.
यानंतर 26 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास तपास करताना तुरीच्या वळीत, सोयाबीनच्या कुटाराखाली तसेच काही शेतात मातीखाली लपवून ठेवलेले अंदाजे दीड टन लोखंडी साहित्य मिळून आले. याची किंमत सुमारे 90 हजार रुपये असल्याचे सांगितले जाते. तसेच घाटबोरी बायपास फाटा येथेही कामासाठी ठेवलेले काही साहित्य चोरीला गेले होते. तेही तुरीच्या ओळीत, कुटाराखाली व मातीखाली लपवलेले मिळून आले. यात लोखंडी सळ्या, गोल पाईप, चॅनल, सी-चॅनल, यू-जॅक आदी साहित्य असून त्याची किंमत सुमारे 75 हजार रुपये आहे.
साहित्य ज्या शेतात सापडले ते शेत राजेश पुंजाजी पाखरे व संदीप पुंजाजी पाखरे यांच्या मालकीचे असल्याचे निदर्शनास आले.
रस्ता कामाचे व्यवस्थापक साय्यद सलीम चांदपाशा (वय 42, रा. पांगरा, जालना) यांनी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, कामासाठी एकूण 5 टन लोखंडी साहित्य (किंमत ₹2,47,500) नेण्यात आले होते. त्यापैकी 3.5 टन साहित्य (किंमत ₹1,57,500) पाखरे यांच्या शेतात लपवलेले मिळाले. उर्वरित 1.5 टन साहित्य (किंमत ₹67,500) अद्याप सापडलेले नाही.
त्यानुसार 27 नोव्हेंबर रोजी दोघांवर कलम 303(2), 3(5), भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पो.हे.का. संजय घिके हे करीत आहेत.
