भरधाव दुचाकीसमोर अचानक आली निलगाय, दोन विद्यार्थी गंभीर, नीलगाय ठार

 
 
 साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : साखरखेर्डा येथील कै. भास्करराव शिंगणे कला, आशालता गावंडे वाणिज्य व नारायणराव गावंडे विज्ञान व फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या दुचाकीसमोर अचानक निलगाय (रोही) आडवी आली. त्यामुळे, झालेल्या भीषण अपघातात निलगाय जागीच ठार झाली, तर दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
8 जानेवारी रोजी सकाळी सुमारे ११ वाजता गणपूर (ता. मेहकर) येथील अनिकेत चव्हाण (वय २२) व दीपक साळवे (वय २१) हे साखरखेर्डा येथील फार्मसी कॉलेजमध्ये जात असताना साखरखेर्डा–मेहकर रस्त्यावर सुखदेव जैवळ यांच्या शेताजवळ अचानक एक निलगाय रस्त्यावर पळत आली. अचानक आलेल्या निलगायीला दुचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले, तर निलगाय जागीच गतप्राण झाली.
अपघातानंतर दोन्ही जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना चिखली येथे हलविण्यात आले.
दरम्यान, साखरखेर्डा, गुंज, गुंजमाथा, सावंगीमाळी, सावंगीभगत, गोरेगाव, सवडद, उमनगाव, मोहाडी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, शेंदुर्जन या परिसरात निलगायांचे कळपच्या कळप मुक्त संचार करीत असल्याने शेतीसह वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. या निलगायांच्या उपद्रवामुळे गहू, हरभरा, मका, भुईमूग, करडी आदी रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
या संदर्भात वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच परिसरात यापूर्वीही गुंज फाट्यावर एका दुचाकीस्वाराचा निलगायमुळे अपघात झाला होता. त्या वेळी गंभीर जखमी युवकाला साखरखेर्डा येथील माजी सरपंच कमलाकर गवई यांनी ठाणेदार गजानन करेवाड यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयात दाखल केले होते.
निलगायांचे कळप रस्त्यावर अचानक येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असून, वनविभागाने तातडीने याची दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.