पूर्णा नदीत बुडून दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; एकाला वाचविण्यात यश...
मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक १ येथील प्रतीक शिवलाल वानखेडे (वय १३), श्रीकृष्ण बाळू भोपळे (वय १४) आणि मिलिंद अजय वाकोडे (वय १३) हे तिघेही इयत्ता आठवीचे विद्यार्थी रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सकाळी रनिंगसाठी घराबाहेर पडले. त्यानंतर ते पूर्णा नदीवरील लहान पुलाखालील नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले. नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने प्रतीक आणि श्रीकृष्ण हे दोघे खोल पाण्यात जाऊन बुडू लागले. त्यावेळी कमी पाण्यात असलेल्या मिलिंदने आरडाओरड करत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मिलिंदचा आवाज ऐकून नदीकाठी शेतात काम करणाऱ्या सौ. नलिनी सोपान पाखरे या तातडीने घटनास्थळी धावून आल्या. त्याचवेळी तिवडी-अजमपूर येथील घाईट कुटुंबीय नदीवर धार्मिक विधीसाठी उपस्थित असल्याने शिवाजी पाटील व त्यांच्या नातेवाईकांनीही मदतीसाठी धाव घेतली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे मिलिंद अजय वाकोडे याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच मानेगाव येथील जलदूत व तरुण कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने नदीत उड्या घेऊन शोधमोहीम सुरू केली. मात्र, काही क्षणांतच प्रतीक व श्रीकृष्ण यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अवघ्या काही मिनिटांत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मृत विद्यार्थ्यांचे पार्थिव पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.