नायलॉन मांजाची विक्री करणारे दोघे पकडले! संग्रामपूर तालुक्यात सोनाळा पोलिसांची कारवाई ; नायलॉन मांजाचा वापर टाळा, अपघात टाळा! पोलिसांचे आवाहन....
Dec 10, 2025, 10:20 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मकर संक्रांतीस अजून काही दिवस असले तरी गावोगावी आकाशात पतंगांची हालचाल सुरू झाली आहे. याच काळात मानवी जीवनासह पक्षी आणि प्राण्यांसाठी धोकादायक ठरणारा नायलॉन प्लास्टिकचा चायना मांजा पुन्हा बाजारात दिसू लागला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.
सोनाळा पोलिसांना ८ डिसेंबर रोजी नायलॉन मांज्याची अवैध विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगळी वेशीवरील पाण्याच्या टाकीजवळ पोलिसांनी धाड टाकली. यावेळी दोन व्यक्ती मांजा विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले. विनोद शिब्रे, विशाल गवई आणि शे. इमरान यांच्या सहकार्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्यांच्या ताब्यातून ३० रील जप्त केल्या.
या प्रकरणात पोलिसांनी विक्रम महादेव ठाकरे आणि गौरव गजानन ढगे या दोघांना रंगेहाथ अटक केली आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ आणि १५ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
