दोन महिन्यांपूर्वी घरात चिमुकल्या मुलाचे आगमन अन् आता पित्याची कायमची एक्झिट! कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; चिमुकल्याचे पितृछत्र हरपले, हिवरखेड पूर्णा गाव सुन्न...
वैभव भुसारी हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरात पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा आणि आई-वडील असा त्यांचा संसार होता. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला होता. नव्या पाहुण्याच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, दुसरीकडे शेतीतील अनिश्चितता, आर्थिक अडचणी आणि कर्जाचा वाढता ताण यामुळे ते चिंतेत असल्याचे सांगितले जात आहे. अशातच १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. कर्जबाजारीपणाच्या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा गावात आहे.
दोन महिन्यांच्या चिमुकल्याला पित्याची ओळख होण्याआधीच काळाचा घाला!
या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब म्हणजे वैभव यांच्या पश्चात अवघ्या दोन महिन्यांचा मुलगा आहे. जगाची पुरेशी ओळखही न झालेल्या या चिमुकल्याला आता वडिलांचे प्रेम आणि आधार मिळणार नाही. वडिलांचे बोट धरून चालायला शिकण्याचे, त्यांच्या खांद्यावर बसून जग पाहण्याचे क्षण त्याच्या आयुष्यात येण्याआधीच पित्याचा आधार हरपला. ज्या घरात दोन महिन्यांपूर्वी बाळाच्या जन्माचा आनंद साजरा झाला, त्याच घरात आज शोककळा पसरली आहे. पत्नीवर चिमुकल्याच्या संगोपनाची जबाबदारी कोसळली असून आई-वडील आणि इतर कुटुंबीयांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे.
कर्जाचा डोंगर, दुष्काळाचे संकट अन् उद्ध्वस्त झालेला संसार!
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. शेतीसाठी केलेला खर्च, अपेक्षेपेक्षा कमी मिळणारे उत्पादन आणि कर्जफेडीची चिंता यामुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत हिवरखेड पूर्ण येथील तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने ग्रामीण भागातील आर्थिक असुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवघ्या २६ व्या वर्षी एका तरुणाचे आयुष्य संपले, दोन महिन्यांच्या चिमुकल्याचा आधार हरपला आणि एका कुटुंबाचे भविष्य अनिश्चित झाले. या कुटुंबाला तातडीने मदतीचा हात देण्याची गरज आहे. ज्या चिमुकल्याच्या जन्माने घरात आनंद फुलला, त्याच चिमुकल्याला पित्याविना मोठे व्हावे लागणार, हीच या घटनेतील सर्वाधिक वेदनादायी बाब ठरली आहे.