

दोन गॅस सिलेंडर फुटले; दोघा भावांचा संसार उघड्यावर; जीव वाचला पण संसाराची राखरांगोळी झाली;
सोयाबीन कापूस, डाळी–साळी सगळ काही आगीत स्वाहा; रोख रकमेची राख झाली; १८ लाखांचे नुकसान! मलकापूर पांग्रा जवळील घटना...
मलकापूर पांग्रा येथील एकनाथ टाले आणि त्यांचे भाऊ शिवाजी टाले हे कुटुंबीयांसह शेतात राहतात. त्यांची घरे शेजारीच आहेत. ६ डिसेंबरला रात्री साडेसात वाजेदरम्यान एकनाथ टाले यांच्या घरात स्वयंपाक बनविला जात होता. त्याचवेळी गॅस गळती झाली आणि आगीचा भडका उडाला. क्षणातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. मोठी आग लागली. आग लागताच कुटुंबीय घराबाहेर पडले. स्फोट झाल्याने शेजारी असलेल्या शिवाजी टाले यांच्या घरातदेखील आग लागली. आगीमुळे त्यांच्या घरातील सिलिंडरचाही स्फोट झाला. या घटनेत दोन्ही भावांची घरे जळून खाक झाली.
शिवाजी टाले यांच्या घरातील बीजोत्पदन आणि सामान्य असा ३२क्विंटल कापूस जळाला. त्याचप्रमाणे
२० क्विंटल सोयाबीन, १५ क्विंटल गहू, १ लाख ६० हजार रुपयांची रोकड, सोन्या, चांदीचा दागिने, कुलर, टीव्ही, पलंग, मोबाइलसह संसारोपयोगी विविध साहित्य भस्मसात झाले.
शिवाजी यांच्या घरातील ८ लाख ८८ हजार रुपयांचे आणि एकनाथ टाले यांच्या घराचे ९ लाख ५८ हजार असे १८ लाख ४६ हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजित दिवटे यांनी तत्काळ मंडळ अधिकारी प्रेमानंद वानखेडे, तलाठी प्रभाकर बाविस्कर, नीलेश किंगरे, कोतवाल समीर पठाण यांना घटनास्थळी पाठविले. पंचनामा करून अहवाल तहसीलदार दिवटे यांच्याकडे सादर करण्यात आलाआगीत जीवितहानी जरी झाली नसली तरी घरातील सर्वसामान जळून खाक झाले. केवळ अंगावरचे कपडे बाकी राहिल्याने दोन्ही भावांचा संसार विखुरला आगग्रस्त दोन्ही भावांना शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे.
आगीच्या घटनेत सर्वकाही जळाल्याने टाले कुटुंबीय अडचणीत सापडले आहे. खाण्यापिण्याची काहीच सोय राहिली नाही. राहण्याकरिता निवारादेखील नाही. अशा संकटसमयी लोकांनी आर्थिक मदत जमा करून टाले कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. ज्यांना मदत द्यायची असेल त्यांनी सरपंच यादवराव टाले व रवी वायाळ यांच्याकडे जमा करावी, असे आवाहनदेखील करण्यात आले.