पांग्री काटे शिवारात दोन शेतकऱ्यांनी लावला अफू; मेहकर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची धाड; १.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त...
भागवत सदाशीव काटे आणि विशाल रमेश काटे अशी अफूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हे सोमवारी रात्री आपल्या पथकासह मेहकर, पांग्री काटे व साखरखेर्डा परिसरात गस्त घालत असताना पांग्री काटे शिवारात अफूची लागवड सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथकासह गट क्रमांक १४८ व १२८ मध्ये छापा टाकला असता अफूचे पीक आढळून आले.
भागवत सदाशीव काटे याच्या ताब्यातून बोंडे, फुले व पाने असलेली १०७ किलो ६६० ग्रॅम वजनाची झाडे (अंदाजे किंमत ८६ लाख १२ हजार ८०० रुपये) जप्त करण्यात आली. तसेच विशाल रमेश काटे याच्याकडून ५७ किलो ३२० ग्रॅम वजनाची झाडे (किंमत ४५ लाख ८५ हजार ६०० रुपये) हस्तगत करण्यात आली. अशा एकूण १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम ८ (क) व १८ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई डीवायएसपी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली एपीआय गजानन करेवाड, पीएसआय गणेश कड, पोहेकॉ डिगांबर चव्हाण, सुनील देशमुख, उमेश घुगे, किशोर बोरे, आकाश काळदाते, सलीम गवळी यांच्यासह आरसीपी पथकाने केली. तसेच सिंदखेड राजा तहसीलचे नायब तहसीलदार संदीप बंगाळे, ग्राम महसूल अधिकारी आनंद राजपूत, कृषी सहाय्यक कोल्हे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आनंदा शिंदे, बुलढाणा फॉरेन्सिक मोबाइल पथक, अंमली पदार्थ शोधक पथक व श्वान पथक यांनीही या धाडसी कारवाईत सहभाग घेतला.