सततच्या नापिकी,वाढत्या कर्जाला कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; नांदुरा आणि घिर्णी येथे घडली घटना...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सततची नापिकी आणि आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एक घटना नांदुरा येथील खुदावंतपूर भागातील असून दुसरी मलकापूर तालुक्यातील घिर्णी येथे घडली आहे.
नांदुरा येथील प्रल्हाद भास्कर कंडारकर (वय ६०) यांनी राहत्या घरातील लोखंडी हुकास दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. सततची नापिकी, आजारपण आणि उदरनिर्वाहाचे इतर साधन नसल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते.
या प्रकरणी मृताचे भाऊ गजानन भास्कर कंडारकर (वय ५६) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सय्यद, पोहेतुले ससाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, आश्विन फेरण व कृष्णा वसोकार यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला. पुढील तपास पोहेकॉ भिमराव वानखेडे हे करीत आहेत.
दरम्यान, दुसरी घटना घिर्णी (ता. मलकापूर) येथे घडली. येथील गोपाल मांगोजी धोरण (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच्या पत्नीला ही बाब शेतात गेल्यानंतर निदर्शनास आली.
गोपाल यांच्याकडे सुमारे दोन एकर शेती असून त्यांनी सोयाबीन आणि तूर पिकांची पेरणी केली होती. मात्र, पिके सुकल्याने त्यांनी निराश होऊन पिकात रोटावेटर मारला होता. वडिलांना पक्षाघात झाल्याने घरचा सर्व भार गोपाल यांच्यावरच होता. कर्जाचा बोजा, सततची नापिकी आणि आर्थिक ताण या कारणांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.
गोपाल यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि तीन बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण घिर्णी गावावर शोककळा पसरली आहे.