व्यापाऱ्याचे सोने लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना राजस्थानातून अटक! काही साेनेही केले हस्तगत; अटक आराेपींची संख्या तीनवर; पाेलिसांच्या पथकाकडून शाेध..!
Aug 27, 2025, 15:37 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :मुंबईच्या सोन्याच्या व्यापाऱ्यास समृद्धी महामार्गावर फर्दापूरच्या टोल नाक्यावर लुटणाऱ्या दराेडेखाेरांपैकी दाेघांना पाेलिसांनी राजस्थान येथून अटक केली. पाेलिसांनी आराेपीच्या मागावर पाच पथके लावली आहेत.या पथकांनी आराेपींकडून काही साेनेही जप्त केले आहे.या प्रकरणात आतापर्यंत पाेलिसांनी तीन आराेपींना अटक केली आहे.
सोने घेऊन समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने निघालेले सोन्याचे व्यापारी अनिल चौधरी यांना मेहकरजवळील टोलनाक्यावर २२ ऑगस्टच्या सायंकाळी सव्वासातच्या सुमारास चाकूहल्ला करून लुटण्यात आले. ४ कोटी ६० लाख रुपयांचे तब्बल पाच किलो सोने लुटून दरोडेखोर फरार झाले. घटनेनंतर चालकही दरोडेखोरांसह फरार झाला. त्याच्या नावाने तक्रार दिल्यानंतर हा पूर्वनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाले. पातूरच्या जंगलात मेहकर, वाशीम, अकोला, अमरावतीचे पोलीस शोध घेत होते. पाच पथके मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे रवाना झाली होती. दरोड्यातील तीन आरोपी हाती लागल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
लवकरच मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले. व्यापाऱ्यासोबत असलेला चालकसुद्धा दरोडेखोरांशी मिळालेला होता.
तो राजस्थानमधील रहिवासी असल्याने दरोडेखोरांचा शोध महाराष्ट्रात घ्यायचा की राजस्थानमध्ये? अशी द्विधा मनस्थिती पोलिसांची होती. दरम्यान, मेहकर पोलिसांची तीन पथके व स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथक अशी पाच पथके आरोपींच्या मागावर आहेत. २३ ऑगस्ट रोजी एक दरोडेखोर पकडला गेला होता, तर मध्य प्रदेश व राजस्थान येथे तपासत गेलेल्या पथकांना दोन आरोपी सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.